आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

BIG NEWS : भरारी पथक नेमूनही बारावीच्या परीक्षांमध्ये होतेय कॉपी; वरिष्ठांच्या आदेशानंतरही गट शिक्षणाधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका..?

पुणे
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिक्षकांशी संगनमत करून भरारी पथकांकडूनच या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं समोर आलं आहे. बारामती, इंदापूर, दौंड, माळशिरस आणि करमाळा येथील काही केंद्रांमध्ये सुरू असणाऱ्या कॉपीच्या प्रकाराबद्दल तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. मात्र तरीही कॉपीचे प्रकार सुरू असल्याचंच समोर येत आहे.

बारामती शहर आणि परिसरात गेल्या काही काळात बेकायदेशीर अकॅडमींनी उच्छाद मांडला आहे. बारामतीसह परिसरातील शाळांमध्ये या विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखवले गेले आहेत. याची चौकशीही झाली असून संबंधित शाळांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत. अशातच बारावीच्या परिक्षांमध्ये या बेकायदेशीर अकॅडमीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी सर्रास कॉपीचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांसाठी भरारी पथकांची नेमणूक केली. मात्र भरारी पथकातील अधिकारीही अकॅडमी आणि शाळांच्या अमिषाला बळी पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या शाळांमध्ये अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच कॉपीचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून या प्रकारांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

याबाबत मोहसीन पठाण यांनी पुन्हा तक्रार केली आहे. त्यानंतर संबंधित केंद्रांवर बैठे पथक नेमण्यात आले आहे. या पथकाने पूर्णवेळ या शाळांमध्ये थांबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, संबंधित शाळांमध्ये शालाबाह्य शिक्षकांना प्रवेशही नाकारण्यात आला आहे. त्यामुळे आता तरी कॉपीचा प्रकार थांबणार का याकडे लक्ष लागले आहे.

अकॅडमीचे शिक्षक सांगतात उत्तरे..!

मागील काही दिवसांत बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार घडल्यानंतर भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. या पथकांनी सूट दिल्यामुळे अकॅडमीतील विद्यार्थी परीक्षा देत असलेल्या केंद्रांमध्ये अकॅडमीतील शिक्षकच विद्यार्थ्यांना उत्तरे सांगत असल्याचा प्रकार समोर आला आहे. लाखो रुपये फी वसूल केल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी दिसू नये म्हणून बेकायदेशीर अकॅडमींचा आटापिटा सुरू असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.  काही ठिकाणी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र संबंधित शिक्षक मोकाटच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us
%d