आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

पुण्याच्या आरटीओ कार्यालयात श्रेयवादावरून ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे
ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

पुणे शहरातील आरटीओ कार्यालयात आज चक्क फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. ओला उबेरच्या दराबाबत झालेल्या बैठकीनंतर टॅक्सी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापसात भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रेयवादावरून झालेल्या या वादातून आरटीओ कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलची तोडफोड केल्याचंही समोर आलं आहे.

ओला, उबेर टॅक्सी चालकांकडून नवीन दर निश्चित करावेत अशी मागणी होत आहे. यासाठी पुण्यातील विविध टॅक्सी संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात एकमत न झाल्यामुळे आरटीओ कार्यालयात बैठक घेऊन याबाबत निर्णय घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.

आज या विषयावर सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत बैठक संपवली. मात्र याचवेळी संघटनेतील अंतर्गत वादातून कॉन्फरन्स हॉलमध्येच फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामध्ये या हॉलमधील काचांची तोडफोड करत खुर्च्याही फेकल्याचा प्रकार घडला. त्या ठिकाणी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत संबंधितांना बाहेर पाठवले.

त्यानंतर कार्यालयाच्या आवारातच पुन्हा वादावादी झाल्याचं समोर आलं. संघटनांमधील वाद वाढतच असल्याचं लक्षात आल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ आरटीओ कार्यालयात दाखल होत संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

 


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us
%d