आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

INDAPUR : कोकण सहल ‘त्या’ शिक्षकासाठी ठरली जीवघेणी; शैक्षणिक सहलीच्या बसच्या अपघातानंतर इंदापूर तालुक्यात हळहळ..!

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

इंदापूर : प्रतिनिधी  

कोकणाची सहल उरकून परतत असताना इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या बसची उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात बाळकृष्ण हरिभाऊ काळे या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक शिक्षक आणि काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

आज गुरुवारी पहाटेच्या वेळी माळशिरस तालुक्यातील वटपळी गावाजवळ हा अपघात झाला. यामध्ये बाळकृष्ण काळे (रा. रेडणी ता. इंदापूर) या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या शैक्षणिक सहलीची बस कोकणातील विविध भागाना भेटी देऊन बावड्याकडे परतत होती.

या दरम्यान, आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वटपळी गावाजवळ उभ्या असलेल्या टेम्पोला बसची जोरदार धडक बसली. त्यामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरे शिक्षक रमाकांत शिरसट हे या अपघातात जखमी झाले आहेत. तसेच काही विद्यार्थीही या अपघातात जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार करून त्यांना पुन्हा सोडण्यात आले आहे. या बसमधून ४० विद्यार्थ्यांसह चार शिक्षक आणि चालक हे प्रवास करत होते.

दरम्यान, विद्यार्थ्यांना एक वेगळा आनंद मिळावा आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने अशा शैक्षणिक सहलीचं आयोजन केलं जातं. मात्र या अपघातानंतर ही सहल बाळकृष्ण काळे या शिक्षकासाठी जीवघेणी ठरली. त्यामुळे इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d