आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

DAUND BREAKING : अजितदादांच्या नावासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; दौंडच्या प्रांताधिकारी कार्यालयात मांडला ठिय्या..!

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

दौंड : प्रतिनिधी

दौंडमध्ये नव्याने सुरू झालेल्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्यावरून महानंदच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत दौंडच्या प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. मागणीनंतरही कोनशिलेत बदल केला नसल्यामुळे प्रशासनाला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

दौंड तालुक्यासाठी राज्य शासनाने नवीन प्रांताधिकारी कार्यालयाला मंजूरी दिली. त्यानंतर नव्याने कार्यालयही सुरू करण्यात आले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते १० डिसेंबर २०२३ रोजी प्रशासकीय इमारतीतील या प्रांत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव होते. प्रत्यक्षात कोनशिलेवर मात्र त्यांचे नाव नसल्यामुळे वैशाली नागवडे यांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता.

अजितदादा हे उपमुख्यमंत्रीपदासह पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांचे नाव असलेली कोनशीला लावण्याची आग्रही मागणी वैशाली नागवडे यांनी केली होती. याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे आज सायंकाळी वैशाली नागवडे यांच्यासह उत्तम आटोळे, विकास खळदकर, वैशाली धगटे, निखिल स्वामी, प्रशांत धनवे, पुरुषोत्तम हंबीर, अनिल नागवडे आदी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या कक्षातच ठिय्या मांडला. यावेळी प्रशासनाचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.

अचानकपणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शिष्टाचारानुसार कोनशिलेवर नाव असणे आवश्यक आहे. परंतु जाणीवपूर्वक राजकारण केलं जात असल्याचा आरोप यावेळी वैशाली नागवडे यांनी केला.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d