आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
ठाणे

संशयामुळे पतीच बनला कुटुंबाचा वैरी.. आधी बॅट डोक्यात घालून पत्नीला संपवलं मग दोन मुलांचाही घेतला जीव; तिहेरी हत्याकांडाने ठाणे जिल्हा हादरला..!

ठाणे
ह्याचा प्रसार करा

ठाणे : प्रतिनिधी   

कौटुंबिक वाद आणि पत्नीवरील संशयातून पतीने पत्नी आणि दोन मुलांना बॅटने मारहाण करत खून केल्याची घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. घोडबंदर परिसरातील कासारवडवली येथे ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अमित धर्मवीर बागडी (वय २९) असे आरोपी पतीचे नाव आहे. तर या घटनेत पत्नी भावना अमित बागडी (२४), सहा वर्षीय मुलगी खुशी आणि आठ वर्षीय मुलगा अंकुश या तिघांचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. आज सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, आरोपी अमित बागडी हा या घटनेनंतर पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हरयाणा राज्यातील इसार जिल्ह्यातील खरडालीपूर येथील मूळचा रहिवासी असलेल्या अमित आणि भावनाचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. या दरम्यान, त्यांना दोन मुलेही झाली. मात्र अमितच्या दारूच्या व्यसनामुळे भावना आपल्या मुलांसह कासारवडवली येथे राहणाऱ्या आपल्या दिराच्या घरी वास्तव्यास आली होती.

अमित हा अधूनमधून आपल्या पत्नी व मुलांना भेटण्यासाठी येत असते. मागील तीन दिवसांपासून तो आपल्या पत्नीजवळ आलेला होता. आज सकाळी अमितचा भाऊ विकास हा आपल्या कामासाठी बाहेर गेला होता. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला. तेव्हा त्याला आपली भावजय भावना आणि दोन्ही पुतणे रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्याजवळ एक क्रिकेटची लाकडी बॅटही पडलेली होती. त्यानंतर विकासने  ही माहिती तात्काळ घरमालकांना दिली.

याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर वागळे इस्टेट परिमंडळचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, कासारवडवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत रोकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास हटेकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पत्नी आपल्या भावाकडे राहत असल्याची सल अमितच्या मनात होती. त्यातूनच आज त्यांच्यात वाद झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दुसरीकडे या घटनेनंतर आरोपी अमित बागडी याच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तैनात केली आहेत.


ह्याचा प्रसार करा
ठाणे
Back to top button
Contact Us
%d