आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षकानं पत्नीचा गळा चिरला, तर मुलाच्या तोंडावर उशी ठेवत हत्या केली अन स्वत:ही गळफास घेत जीवन संपवलं; बार्शीतील घटनेनं उडाली खळबळ

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

बार्शी : प्रतिनिधी

शिक्षकानं आपल्या पत्नीचा गळा चिरून मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली आहे. बार्शी शहरातील उपळाई रस्त्यावरील नाईकवाडी प्लॉट येथे ही घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.

या घटनेत शिक्षक पती अतुल सुमंत मुंढे (वय ३८), पत्नी तृप्ती अतुल मुंढे (वय ३७) आणि मुलगा ओम अतुल मुंढे या तिघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी तृप्ती मुंढे या बार्शी येथील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या.

मुंढे कुटुंबीय उपळाई रस्त्यावर वास्तव्यास होते. पहिल्या मजल्यावर ते स्वत: आणि खालच्या मजल्यावर त्यांचे आई-वडील राहत होते. आज सकाळी वरच्या मजल्यावरून कोणीही खाली आले नसल्याने अतुल यांच्या आईवडिलांनी वर जाऊन पाहिले तेव्हा ही घटना उघडकीस आली.

या घटनेनंतर बार्शी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, एका शिक्षक दांपत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे बार्शी परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा आता बार्शी पोलिसांकडून तपास केला जात आहे.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d