आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

चोरीच्या संशयावरून अघोरी प्रकार; थेट भोंदुबाबासमोर पत्नीला करायला लावली विवस्त्र पूजा, पन्हाळा तालुक्यातील धक्कादायक प्रकारानं उडाली खळबळ

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

पन्हाळा : प्रतिनिधी     

एखाद्यावर चोरीचा संशय असेल तर आपण त्यांची पोलिसांमार्फत किंवा अन्य मार्गाने शहानिशा केल्याचं पाहिलं आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात चोरीच्या संशयावरून एक धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. चोरीच्या संशयावरून आपल्या पत्नीला एका भोंदुबाबासमोर विवस्त्र पूजा करायला भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित भोंदुबाबासह पती आणि सासुवर पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमानुष, अनिष्ट व अघोरी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत भोंदूबाबा रामू कोलकर ऊर्फ रामा मिस्त्री याच्यासह संबंधित महिलेच्या पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पन्हाळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित कुटुंबियांच्या घरातून एक सोन्याची चैन चोरीला गेली होती. त्याची चौकशी करण्यासाठी फिर्यादी महिलेचा पती एका भोंदुबाबाकडे गेला होता.

तुझ्या पत्नीने चैन चोरून तिच्या आईला दिली असल्याचं या भोंदुबाबाने सांगितले. याचदरम्यान पतीने पत्नीला चोरीबद्दल विचारणा केली. परंतु तिचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्या भोंदुबाबाच्या मदतीने पूजा करण्याचे ठरवले. त्यानुसार पती आणि सासूने या भोंदुबाबाच्या समोर या पीडितेला विवस्त्र पूजा करण्यास भाग पाडले.

दुसरीकडे या भोंदूने या महिलेकडे अनेकदा शारीरिक संबंधाची मागणी केली होती. परंतु तिने त्याला दाद दिली नाही. ऑगस्ट महिन्यात हा प्रकार घडला. त्यानंतर या महिलेने पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अमानुष, अनिष्ट व अघोरी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत या भोंदूसह पती व सासुवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड हे करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d