आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

MAHA POLITICS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीकरांना दिलं ‘खास’ आश्वासन; म्हणाले, तिजोरीच्या चाव्याच अजितदादांकडे..!

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

अजितदादांनी बारामतीचा कायापालट करून विकासाचं मॉडेल बनवलं आहे. बारामतीत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची कामे केली असून यापुढेही बारामतीला एक नंबर बनवण्याचा अजितदादांचा मानस आहे. विशेष म्हणजे, तिजोरीच्या चाव्याच अजितदादांच्या हातात असून सरकार कुठेही बारामतीसाठी निधी देताना हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्याचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या कामाचं कौतुक केलं. बारामतीत झालेलं प्रत्येक काम हे दर्जेदार आणि प्रत्यक्ष जाऊन पाहण्यासारखं आहे. बारामतीला राज्यात नंबर वन बनवण्याचा अजितदादांचा मानस पूर्ण करण्यासाठी सरकार हात आखडता घेणार नाही असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

आमचं सरकार विकासात कोणतंही राजकारण आणत नाही. सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जात आहोत असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विकासकामे करताना सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांच्या दर्जात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येते. राज्यात यापूर्वी नोकरभरती बंद होती. या शासनाने ७५ हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत १ लाख ६० हजार रोजगार दिले आहेत. विविध नोकर भरती सुरू असून २२ हजार पोलिसांची भरती, ३० हजारावर शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेलेही समाविष्ट आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d