आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

EMPLOYMENT : बारामतीत आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी १८ हजार ७५४ उमेदवारांचा सहभाग; १० हजार उमेदवारांच्या नोकरीवर शिक्कामोर्तब

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार विभागीय मेळाव्यात आज पहिल्याच दिवशी जवळपास १८ हजार ७५४ उमेदवारांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ८ हजार ७१६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून १०७३ उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. राज्य शासनाने आयोजित केलेल्या या मेळाव्यामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार आहे.

बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्याचे उदघाटन आज करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आज १८ हजार ७५४ उमेदवार सहभागी झाले. त्यामध्ये ८ हजार ७१६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. तर १०७३ उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. तालुकास्तरावर आयोजित मेळाव्यात मोठ्या प्रमाणात उमेदवारांचा सहभाग असून जवळपास १० हजार जणांना नोकरी मिळणार आहे.

युवकांच्या नवनवीन संकल्पनांना प्रोत्साहन मिळावं यासाठी १७ स्टार्टअप कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून उमेदवारांच्या संकल्पनांना बळ देण्यासाठी व उद्योजकीय दृष्टीकोन वाढीस लागावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. कौशल्य प्रशिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी जवळपास २६ स्टॉलद्वारे विविध कौशल्यांबाबत माहिती देण्यात आली.

स्वयंरोजगार व अर्थसहाय्य करणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहितीही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध महामंडळे, बँका, स्मार्ट, मॅग्नेट, पोस्ट ऑफिस, सारथी, देअसरा फाउंडेशन, इन्क्यूबेशन सेंटर, टेक्सटाईल पार्क, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग अशा संस्थांचे जवळपास २५ स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

  


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us
%d