आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित..? ‘या’ कारणामुळे होतेय उमेदवारीची चर्चा

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक जवळ येवून ठेपली असून बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार याच खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगत आहे. अशातच सुनेत्रा पवार यांच्या कामाबद्दल माहिती देणारे प्रचाररथ गावोगावी फिरू लागल्याने त्याच बारामती लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ जुलै रोजी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष अजितदादांचाच असल्याचा निर्णय देत त्यांना पक्ष आणि चिन्ह दिले. त्यानंतर काल आमदार अपात्रतेच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अजित पवार यांचीच मूळ राष्ट्रवादी असल्याचं सांगत दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवलं.

दरम्यानच्या काळात, अजितदादांनी बारामतीत आपण जो उमेदवार देऊ त्याला विजयी करावं असं आवाहन केलं होतं. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची नावे चर्चेत आली. अशातच सुनेत्रा पवार यांनी कालच दौंडचे आमदार राहुल कुल आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर आज बारामतीसह विविध भागात सुनेत्रा पवार यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत असलेले प्रचाररथ  फिरू लागले आहेत. त्यामुळे बारामतीत सुनेत्रा पवार याच निवडणूक लढवतील अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार कोण असेल हे आपण लवकरच जाहीर करू असं म्हटलं आहे. मात्र अजित पवारच निवडणुकीत उभे आहेत असं समजून मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आजही त्यांनी याबाबत पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सुनेत्रा पवार या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील असे संकेत आता मिळू लागले आहेत.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us
%d