आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीसह नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाचे उद्या अजितदादांच्या हस्ते लोकार्पण

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या माध्यमातून बारामती शहरात उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सदनिकांचे आणि बारामती नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाचे लोकार्पण उद्या गुरुवार दि. १४ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उघडा मारुती मंदिर परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्पाचे भूमीपूजनही अजितदादांच्या हस्ते होणार आहे.

बारामती शहरातील अमराई भागात महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत उभारण्यात आली आहे. कमी जागेत नावीन्यपूर्ण पद्धतीने दर्जेदार अशी ही वसाहत उभी राहिली आहे. भविष्यात अशाच पद्धतीने बारामतीत विविध ठिकाणी ही योजना राबवण्याचा अजितदादांचा मानस आहे. या वसाहतीचे लोकार्पण उद्या गुरुवारी सकाळी ७.३० वाजता होणार आहे.

शहरातील उघडा मारुती मंदिर परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्याचेही भूमिपूजन उद्या अजितदादांच्या हस्ते होणार आहे. तसेच बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वे नं. २२० येथे उभारलेल्या व्यापारी संकुलाचा लोकार्पण समारंभ उद्या पार पडणार आहे.

बारामती शहराच्या वैभवात भर घालणारी विकासकामे होत आहेत. तसेच नागरिकांना दर्जेदार आणि चांगल्या स्वरूपातील घरे उपलब्ध व्हावीत यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही आहेत. त्यातूनच त्यांच्या संकल्पनेतून विविध ठिकाणी घरकुल योजनांचे काम हाती घेतले जाणार आहे.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us
%d