आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
बारामती

BARAMATI : राजकीय पंढरी बारामतीत जमणार पत्रकारांची मांदियाळी; १८ व १९ नोव्हेंबर रोजी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्य शिखर अधिवेशन

बारामती
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

देशभरात नावारूपाला आलेल्या  ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन येत्या १८ व १९ नोव्हेंबरला बारामती येथील गदिमा सभागृहात पार पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर या अधिवेशनाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ पत्रकारांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं राजकीय पंढरी असलेल्या बारामतीत पत्रकारांची मांदियाळी जमणार आहे.

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या या शिखर अधिवेशनाच्या  उद्घाटन सत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, खा. हेमंत पाटील, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय उपाध्यक्ष मंदार फणसे, धर्मेंद्र जोरे उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सत्रापूर्वी पहिल्या सत्रात सर्वांच्या स्वागत सोहळ्यासोबतच आमची भूमिका, कार्य व जबाबदारी या विषयावर संघटनेचे सर्व राष्ट्रीय, प्रदेश, विंगचे अध्यक्ष आपली भूमिका मांडणार आहेत. उद्घाटन सत्रानंतर महिलांचे पत्रकारितेतील स्थान, प्रगती आणि अडचणी, आव्हाने या विषयावर सारिका मल्होत्रा, शैलजा जोगल, रेणुका कड, सुकेशनी नाईकवाडे, श्रीमती शाहीना, संजना खंदारे, यास्मिन शेख, अश्विनी डोके आदी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.

त्या नंतरच्या सत्रात जीवनगौरव पुरस्कार वितरण व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार विचारवंत तथा लेखक कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार विचारवंत, लेखक कुमार सप्तर्षी, सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ पत्रकार विचारवंत व लेखक प्रकाश पोहरे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, ज्येष्ठ पत्रकार जयश्री खाडिलकर, ज्येष्ठ पत्रकार आदिनाथ चव्हाण यांना जीवन गौरव पुरस्काराने

गौरविण्यात येणार आहे. या सत्रामध्ये संजय आवटे हे या सर्व संपादकांची प्रगट मुलाखत घेणार आहेत. त्या नंतरच्या सत्रामध्ये बदनाम पत्रकारितेची कारणे, मीमांसा व पर्याय या विषयावर धर्मेंद्र जोरे, चंद्रमोहन पुप्पाला,मंदार फणसे,  सुनील कुहीकर हे सहभागी होतील.

१९ नोव्हेंबरला पहिल्या सत्रात आम्ही जिल्ह्याचे शिलेदार व माझा जिल्हा माझे काम या विषयांच्या अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्ष त्यांची भूमिका मांडतील. समारोपीय सत्राला ज्येष्ठ समाजसेवक राधेश्याम चांडक, खासदार सुप्रियाताई सुळे यांची उपस्थिती राहणार आहे. हे अधिवेशन राज्यातील सर्व पत्रकार यांच्यासाठी महत्वाचे असणार आहे. पत्रकार महामंडळ, पत्रकारांचे घर, पत्रकार पेन्शन, आदी महत्त्वाचे विषय या अधिवेशनात चर्चेसाठी आणि शासनाकडे मागणीसाठी येणार आहेत. अशी माहिती ‘व्हॉइस ऑफ मीडिया’संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ, बारामती अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी दिली आहे.

व्हॉइस ऑफ मीडियासंघटनेबद्दल

तीन वर्षांपूर्वी राज्यातील वीस संपादकांनी एकत्रित येऊन पत्रकारितेसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेची स्थापना केली. पत्रकारांना पेन्शन, आरोग्य, हक्काची घरे, प्रत्येक तालुका स्तरावर पत्रकार भवन, पत्रकारांना पेन्शन, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, आरोग्य आदी विषयांवर काम करण्याची योजना आखली. याला बऱ्यापैकी मूर्त रूप प्राप्त झाले आहे. आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ देशभरात प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यरत आहे. आज देशामध्ये ३७ हजार पत्रकार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’शी जोडले गेलेले आहेत.

महाराष्ट्रात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सदस्य संख्या साडेसहा हजारच्यावर आहे. सुमारे साडेपाच हजारांवर पत्रकारांचा दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा काढण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यातल्या सर्व विभागांचे अधिवेशन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने त्या त्या भागात घेतले. आता ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्याचे शिखर अधिवेशन होत आहे. देशातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष या अधिवेशनाच्या निमित्ताने बारामतीमध्ये येणार आहेत. पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी, नव्याने विकसित होत असलेल्या पत्रकारितेच्या तंत्रज्ञानासाठी या अधिवेशनामध्ये चर्चाविनिमय होणार आहे. यात काही ठराव घेतले जाणार आहेत, जे राज्य आणि केंद्र सरकारला दिले जाणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
बारामती
Back to top button
Contact Us
%d