आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
अर्थकारण

ACB TRAP : रस्त्याच्या कामासाठी शिफारस करण्यासाठी ६ लाख रुपयांची लाच घेताना बडा अधिकारी जाळ्यात; नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यासह लिपिकाला रंगेहाथ पकडले..!

अर्थकारण
ह्याचा प्रसार करा

नांदेड : प्रतिनिधी

रस्त्याच्या कामाच्या निविदा स्वीकृतीसाठी मुख्य अभियंत्यांकडे शिफारस करण्यासाठी ६ लाख रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडच्या अधीक्षक अभियंत्यासह एका लिपिकास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित अभियंत्याच्या घराची झडती घेतली असता तब्बल ७२ लाख ९१ हजार ४९० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत आणि वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी रोड या रस्त्यांचे दोन कामांचे टेंडर संबंधित तक्रारदाराला मिळाले होते. या कामांच्या निविदा स्वीकृतीची शिफारस करण्याबाबत तक्रारदाराने नांदेडचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांची भेट घेतली.

राजपूत यांनी मंजूर झालेल्या १४ कोटी १० लाख रुपयांच्या दोन निविदांच्या अर्धा टक्के रक्कम देण्याची मागणी संबंधित तक्रारदाराकडे केली. तुम्ही रक्कम दिली तर मी मुख्य अभियंत्यांकडे शिफारस करेल असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने वरीष्ठ लिपिक विनोद कंधारे यांची भेट घेतली. त्यांनी स्वत:सह सोबतचे लिपिक जयंत धावडे यांच्यासाठी प्रतिनिविदा २५ हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती.

लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तक्रारदाराला पुन्हा अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांच्याकडे पाठवले. या भेटीत ७ लाख रुपये जात होतात, काहीतरी कमी करा अशी विनंती तक्रारदाराने केली. तडजोडीअंती राजपूत याने ६ लाख रुपयांवर काम करण्याचे कबूल केले आणि ही रक्कम लिपिक कंधारे यांच्याकडे देण्यास सांगितलं. लाचलुचपत विभागाने रचलेल्या सापळ्यानुसार ही रक्कम घेताना कंधारे याला रंगेहाथ पकडण्यात आले.

त्यानंतर राजपूत याच्या घरासह कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये ७२ लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळून आली. रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी नांदेडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ह्याचा प्रसार करा
अर्थकारण
Back to top button
Contact Us
%d