आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

SHARAD PAWAR : हेलिकॉप्टरमधून हळदीची शेती पाहिली अन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आठवली अंगरक्षकाची जखम; पीए सतीश राऊत म्हणतात.. आठवण ओली असली कि ती खूप दिवस टिकते हे साहेबांचं सुत्र…!

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमी प्रवासात असताना प्रत्येक गोष्टीची बारकाईने चौकशी करत असतात. हवाई प्रवासात तर शरद पवार येणारं गाव कोणतं, तिथली माणसं, शेतीची परिस्थिती यावर बोलत असतात. नुकताच शरद पवार यांनी कागल दौरा केला. हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान एके ठिकाणी हळदीची शेती पाहताना त्यांना आपल्या अंगरक्षकाची जखम आठवली. हा प्रसंग शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांनी शब्दबद्ध केलाय..

शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत हे सातत्याने विविध प्रसंग शब्दबद्ध करत असतात. नुकतीच त्यांनी शरद पवार यांच्या सोलापूर ते कागल दौऱ्याबद्दल एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी शरद पवार यांचं वेगळेपण अधोरेखित केलंय.

हळदीची शेती पाहिल्यानंतर शरद पवार यांना आपले अंगरक्षक सुनिल बाबर यांच्या जखमेची आठवण झाली आणि त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. या प्रसंगावरुन आठवण ओली असली कि ती खूप दिवस टिकते हे साहेबांचं सुत्र असल्याचं सतीश राऊत म्हणतात.

हळद आणि जखम

साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आणि पुन्हा जोमाने कामाला लागले. चूकलंच !   ‘पुन्हा’ म्हणता येत नाही कारण साहेबांचा कामाचा जोम अक्षय्य असतो. ऐन ग्रीष्मातला साहेबांचा हा दौरा प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-सांगोला आणि पुढे कागल, निपाणी असा होता. सोलापूरची ही भूमी साहेबांना अधिक उर्जा देते. ८ मे, २०२३ हा जिल्ह्यातील भरगच्च कार्यक्रमांचा दूसरा दिवस होता. दूपारी बाराच्या सुमारास सांगोल्यातील बाबूराव गायकवाड यांच्या पंच्चाहत्तरीचा कार्यक्रम संपवून मी, दीपकआबा साळूंखे, पी.एस.ओ. सुनील बाबर साहेबांसोबत हेलिकॉप्टरने कागलच्या दिशेला निघालो. दीपकआबा आणि मला प्रवासात जाणवले की साहेब आज कमालीचे खूष आहेत.

मी नेहमी पाहतो की, हेलिकॉप्टर मधून हवाई प्रवास करताना साहेब अधिक खुलतात. आयुष्याची ६३ वर्षे पादाक्रांत केलेला , डोळ्याखालून घातलेला भाग पाहताना त्यांना नोस्टॅल्जिक फिलींग्ज येतात. त्या यावेळी देखील आल्या. मी गुगल मॅप मध्ये आधीच बघून ठेवलं होतं की, आज ही नोस्टॅल्जिक सफर कोणत्या भागावरून होणार आहे. सांगोला, शिरढोण, सांगली, जयसिंगपूर,  इचलकरंजी, कागल असा तो प्रवास असणार होता. थोडक्यात आमचा प्रवास डाळींब ते द्राक्षे आणि द्राक्षे ते ऊसच-ऊस असा होणार होता. मानदेशावरून जाताना साहेब आणखी बोलके झाले होते. सांगोल्यात येण्यापूर्वी त्यांनी मंगळवेढ्याची मोती पिकवणारी विस्तिर्ण काळीभोर जमीन  दाखवली होती, सांगोल्यात डाळींबांच्या फळशेतीमुळे आलेल्या सुबत्तेचे दर्शन घडवणारी स्लॅबची घरे दाखवली होती.

साहेबांना खमक्या माणदेशी माणसाचे अपार कौतुक आहे. आभाळाला पाझर फुटत नाही म्हणून इथल्या लोकांनी पत्थर फोडून मैल-मैल लांबून आपल्या शिवारात पाणी आणलं आहे. साहेब भाषणात , प्रवासात माणदेशातील अशा भगिरथांचा आणि हिरे-माणकांचा अनेकदा उल्लेख करतात. यावेळी त्यांनी ग.दि.मां.शी ज्यांची जोडी जमली त्या सांगली जिल्ह्यातील कुंडल गावच्या स्वातंत्र्य शाहीर शंकरराव निकमांची आठवण काढली. १९४२ नंतर पत्री सरकार चालवून इंग्रजांची हाडं जिरवणारे क्रांतीसिंह नाना पाटील ज्यांना ‘माझा दोस्त म्हणायचे ’ ते शाहीर निकम ! मी अलिकडेच संपत मोरेंच्या फेसबुक पेजवर वाचले होते की, शरद पवार साहेबांच्या आणि शाहीर शंकरराव निकमांच्या वयात खूप अंतर असले तरी मनात अंतर यत्किंचितही नव्हते. शाहीर आजारी पडल्यानंतर कोणताही गाजावाजा न करता साहेबांनी आमदार अनिल बाबरांकडे उपचारासाठी मदत पाठवून दिली होती.

माणदेशी माणसांची महती ऐकता-ऐकता जाणवले की, डाळींबांची जागा द्राक्ष पिके घेऊ लागली आहेत. आम्ही सांगलीच्या हद्दीत प्रवेशल्याची ती खूण होती. साहेबांनी कवठेमहाकाळ -तासगावच्या परिसरात शेतमळ्यावर द्राक्षांचे घड सुकवण्यासाठी उभारलेले आच्छादनाखालचे जाळीदार शेड दाखवले. काही दिवसांपूर्वीच साहेबांच्या साक्षीने नवी मुंबईच्या कृषि उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याचा पहिला सौदा झाला होता. तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. नंतर हेलिकॉप्टर बरोब्बर सांगली-मिरजवरून गेलं. कृष्णाकाठ लागेपर्यंत मिरजेच्या परिसरात पोयटा मातीच्या ढिगाऱ्यांवर पिवळ्या प्लॅस्टीक अथवा ताडपत्रीसारखी आच्छादनं दिसत होती. साहेबांनी ही हळदीची शेती असल्याचे सांगितले. उंचावरून स्पष्ट दिसत नव्हतं पण ते लागवडीसाठी तयार असलेले हळदीचे ढिग असावेत असे मी अनुमान काढले.

साहेब म्हणाले की, महाराष्ट्रात हळदीचं सगळ्यात जास्त उत्पादन ह्याच भागात होतं. मी पुस्ती जोडून हिंगोली-बसमत शर्यतीत असल्याचं आणि हल्ली वाईच्या परिसरात देखील हळद लागवड वाढल्याचं सांगितलं. साहेबांनी होकारार्थ दर्शवला. सांगलीतील वाळवा, पलुस, मीरज हा भाग हळदीचे कोठार. इथे अक्षय्य तृतीयेला लागवडीला सुरूवात होते पण सरी-वरंब्याची शेतं रिकामी दिसत होती, कदाचित वाढत्या उष्म्याने लागवड लांबणीवर पडली असावी.

हळद बहुगुणी पीक. जखमेवर,सूजेवर हळद चोळली की ती जखम भरून निघते, सूज कमी होते. हळदीचा विषय रंगत असताना साहेबांची नजर समोर अंग चोरून बसलेल्या पि.एस.ओ. बाबर यांच्या हाताकडे गेली. ‘हाताला लागलेलं बरं झालं का ?’ असं साहेबांनी विचारलं. बाबर गोंधळात पडले. साहेब कोपरापासून मनगटाकडे काय बघतात हे त्यांना क्षणभर समजेना. मी म्हटले “लोणावळा घाटात सुमो पलटी होऊन तुमच्या हाताला लागले होते . साहेब ते पाहतायेत.” बाबर ‘जखम अगदी बरी झाल्याचे, व्रण देखील राहिले नसल्याचे’ दाखवू लागले. वर्षभरापूर्वी पुणे-मुंबई प्रवासा दरम्यान लोणावळा घाटात नागफणीचा कडा (ड्यूक-नोज) नजरेच्या टप्प्यावर येतो अगदी त्या  वळणावर गाडी पलटी झाली.अपघातासारखी एखादी घटना डोळ्यादेखत घडली तरी साहेब शांत राहतात. पण त्यांच्या मनात त्या घटनेचे पडसाद उमटलेले असतात. 

पहा ना ! घाटातल्या अपघातात बाबरांच्या हाताला झालेली जखम पुर्ण बरी झाली तरी साहेबांच्या मनातून ती सुकली नव्हती. साहेबांनी विचारपूस केल्याने ती घटना जिवंत झाली होती पण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या बाबरांच्या मनाला  किती मोठा आराम मिळाला असणार ! धान्य असो वा बेदाना तो सुकला कि अधिककाळ टिकतो हे शेतीचं सुत्र आहे पण आठवण ओली असली कि ती खूप दिवस टिकते हे साहेबांचं सुत्र मी पाणावलेला कृष्णाकाठ पाहता-पाहता नजरेनं टिपत होतो……!


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us
%d