आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

BIG BREAKING : संसदेच्या सुरक्षेच्या कारणावरून गदारोळ; विरोधी पक्षांचे तब्बल ३१ खासदार निलंबित, अधीर रंजन चौधरी यांच्यासह अन्य खासदारांचा समावेश

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था   

संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षातील ३१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही मोठी कारवाई केली आहे. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह इतर प्रमुख खासदारांचा समावेश आहे.

मागील आठवड्यात संसदेची सुरक्षा भेदून काही तरुणांनी लोकसभेत प्रवेश केला होता. या तरुणांनी थेट लोकसभेत गोंधळ घालत विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा करावी, अशी विरोधी पक्षांकडून मागणी करण्यात आली आहे. यावरुनच लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

संसदेच्या सुरक्षेच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून सभागृहात गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेसह राज्यसभेतही गोंधळ घातला. या पार्श्वभमीवर गोंधळ घालणाऱ्या ३१ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या काळापर्यंत निलंबित करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील १३ खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.

संसदेत खासदारांच्या गदारोळानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांच्या ३१ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मान्यता देत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या खासदारांना निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, टीआर बालू आणि दया निधी मारन यांचा समावेश आहे. दरम्यान, निलंबनाच्या या कारवाईनंतर लोकसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us
%d