आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
उत्तर महाराष्ट्रमुंबई

Political Breaking : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार स्वत: लक्ष घालणार

उत्तर महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

यापुढील काळात आपल्याला पक्षसंघटना वाढवून ती बळकट करायची आहे, अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज मांडली. त्याचवेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, एकनाथ खडसे, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन त्याची प्रतिष्ठा कशी राखली जाईल, हा आपला प्रयत्न आहे. मुंबईत आपला पक्ष वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करतोय. पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे कार्यकर्ते बोरीवलीपासून कुलाब्यापर्यंत प्रयत्न करत असल्याबद्दल शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले. 

राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबई शहर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अधिक सतर्कपणे प्रत्येक उमेदवार देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सातत्याने लोकांमध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. याद्वारे पक्षाची भूमिका प्रकर्षाने मांडण्यास मदत होईल असे स्पष्ट मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी मांडले.

मुंबई शहरात पाणी, मीटर, सांडपाण्याचा निचरा असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे आपल्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे अशी सूचना छगन भुजबळ यांनी केली. 

आज गुरुपौर्णिमा असून यादिवशी सर्वांनी आदरणीय पवारसाहेबांना गुरूदक्षिणा म्हणून मुंबई शहरात आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवून दाखवण्याचा निर्धार करा असे आवाहन छगन भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना केले. 

पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलेल्या कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली. नवाब भाई यांनी केंद्रसरकारची केलेली पोलखोल अतिशय उल्लेखनीय होती. त्यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्राने त्यांना निष्कारण त्रास देण्याचा डाव आखला असल्याचे सांगून बेरोजगारी, महागाई अशा सर्व मुद्द्यांवर लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून त्याविरोधात आवाज उठवा असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

या बैठकीला पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, माजी खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सचिव नरेंद्र वर्मा, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय महिलाध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय सामाजिक न्याय सेल अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विभागीय अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
उत्तर महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d