आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
उत्तर महाराष्ट्र

CRIME BREAKING : तीन कोटींच्या बिलासाठी ‘त्या’ सहाय्यक अभियंत्यानं मागितली एक कोटींची लाच; नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडत केला करेक्ट कार्यक्रम

उत्तर महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

अहमदनगर : प्रतिनिधी  

शासकीय कामे करताना आर्थिक अडवणुकीचे अनेक प्रकार घडत असतात. अशातच अहमदनगर येथे तीन कोटी रुपयांच्या बिलासाठी तब्बल एक कोटी रुपये लाच घेण्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंत्याला एक कोटींची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. याप्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर गायकवाड (वय ३२ वर्ष) असे या लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत येणारं १०० एमएम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम एका ठेकेदाराने केले होते. त्यापोटी २ कोटी ९९ लाख रुपये बिल संबंधित ठेकेदाराला येणे होते. त्यामुळे या ठेकेदाराने नियमानुसार प्रक्रिया करत बिलाची मागणी केली. त्यासाठी मागील तारखेचे बिल आउटवर्ड करून त्यावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गायकवाड यांनी ठेकेदाराकडे तब्बल एक कोटींच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबत संबंधित ठेकेदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ही रक्कम शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील शेंडी बायपास येथे देण्याचे ठरले. काल सहाय्यक अभियंता गायकवाड हा रस्त्यालगत असलेल्या आनंद सुपर मार्केटच्या मोकळ्या जागेत आला. त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने ही रक्कम त्याच्याकडे सुपूर्द केली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडून शासकीय विश्रामगृहात नेले.

त्या ठिकाणी चौकशी करून पंचनाम्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. या प्रकरणी नागापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पाकीट पोहोचलं आहे..!

गायकवाड याने लाच स्वीकारल्यानंतर उपअभियंता गणेश वाघ याला फोन केला. आपलं पाकीट मिळालं आहे, तुमचा  वाटा कुठे पोहोचवायचा अशी विचारणा केली. त्याचवेळी त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेत कोटींच्या पाकीटाचा करेक्ट कार्यक्रम केला.

 


ह्याचा प्रसार करा
उत्तर महाराष्ट्र
Back to top button
Contact Us
%d