आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मराठवाडा

BREAKING NEWS : मराठा आरक्षण मिळेपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका; हिंगोली पाठोपाठ संभाजीनगर जिल्ह्यातही युवकाची सुसाईड नोट लिहीत आत्महत्या..!

मराठवाडा
ह्याचा प्रसार करा

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी  

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीत एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघड झाली. त्यानंतर काही तासातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही एका युवकाने आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. शाळेतील पाटीवर सुसाईड नोट लिहित या युवकाने आत्महत्या केली आहे. आरक्षण मिळेपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका असेही त्याने यामध्ये नमूद केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गणेश काकासाहेब कुबेर या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपतगाव येथील हा युवक असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका असे त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. या घटनेनंतर आपतगावच्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. गणेश याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

हिंगोलीत युवकाची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरमधील आपतगाव येथील आत्महत्येपूर्वी हिंगोली जिल्ह्यातही एक आत्महत्येची घटना समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील देवजना येथे कृष्णा उर्फ लहू यशवंतराव कल्याणकर या पंचवीस वर्षीय युवकाने स्वत:च्या शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्याने लिहिली आहे.

दरम्यान, मराठवाड्यात आज दिवसभरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोन युवकांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढत असतानाच आत्महत्येच्या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. शासनाने तात्काळ आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढून या आत्महत्या रोखाव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 


ह्याचा प्रसार करा
मराठवाडा
Back to top button
Contact Us