आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मराठवाडा

ACB TRAP : फेर नोंदीसाठी मागितली ३० हजारांची लाच; महिला तहसीलदारासह महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडलं..!

मराठवाडा
ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी   

प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अनेकदा पैशांसाठी अडवणुकीचे प्रकार घडतात. यातूनच अनेकजण लाचखोरीत अडकतात. अशीच एक घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे घडली आहे. वारस नोंद लावण्यासाठी ३० हजारांची लाच घेणाऱ्या बदनापूरच्या महिला तहसीलदारासह महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

बदनापूरच्या तहसीलदार सुमन उद्धवराव मोरे (वय ५०) आणि महसूल सहाय्यक नीलेश धर्मराज गायकवाड (वय २८) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीच्या आजोबांच्या नावावर बदनापूर शिवारातील गट नंबर ८५ व ८६ आणि मौजे रामखेडा शिवारातील गट क्र.९ मधील शेत जमीन होती. आजोबा मयत झाल्यानंतर वारस म्हणून तक्रारदार यांचे चुलते यांच्या एकत्रित कुटुंबकर्ता अशी सातबारावर नोंद घेण्यात आलेली होती. एकत्रित कुटुंबकर्ता ही नोंद कमी करून इतर वारसांची सातबारावर नावे नोंदवण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.

मात्र नवीन नोंद लावण्यासाठी तीस हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांना करण्यात आली होती. त्यामुळे तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. काल सायंकाळी तहसील कार्यालयातच महसूल सहाय्यक नीलेश गायकवाड याने ही रक्कम स्वीकारली. त्यानंतर तहसीलदार सुमन मोरे यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द केली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांना रंगेहाथ पकडले. जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक किरण बिडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
मराठवाडा
Back to top button
Contact Us
%d