आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मराठवाडा

BIG BREAKING : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आर-पारची लढाई; उद्यापासून पाणीही बंद करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा

मराठवाडा
ह्याचा प्रसार करा

जालना : प्रतिनिधी  

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांनी गेल्या दहा दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. सरकारकडून अद्याप आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे उद्यापासून सलाईन काढून पाणीही बंद करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनादरम्यान, राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु आरक्षणावर ठोस निर्णय झाल्याशिवाय आपण उपोषण थांबवणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर राज्य शासनाकडून आरक्षणाबाबत शासन निर्णयही पारित झाला. परंतु जरांगे यांना हा निर्णय पटलेला नसल्यामुळे त्यांनी काही बदल सुचवले होते. आजही शासनाकडून जरांगे यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. परंतु तो त्यांना मान्य झालेला नाही. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मी आमरण उपोषण सुरू केले असून शासनाच्या सांगण्यावरून पाणी आणि उपचार घेत होतो. सरकारला दिलेली मुदतही आता संपली आहे. त्यामुळे उद्या सकाळपासून पाणी आणि शासनामार्फत सुरू असलेले उपचारही त्यागणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे.  यापुढे शासनाशी चर्चा करायची का नाही याबद्दलही राज्य पातळीवरील प्रमुखांशी बोलून निर्णय घेणार असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे. त्या अनुषंगाने शासनाने बदल करावेत असं आमचं म्हणणं आहे. परंतु आता नव्याने काढलेल्या शासन निर्णयात कोणतेही बदल केलेले नाहीत. वंशावळ पुरावे असतील तरच कुणबी प्रमाणपत्र मिळेल ही शासनाची भूमिका आहे. प्रत्यक्षात २००४ च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी आमची मागणी आहे. ज्या विषयावर आमची चर्चा झाली तीच या शासन निर्णयात नमूद नाही. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.


ह्याचा प्रसार करा
मराठवाडा
Back to top button
Contact Us
%d