बीड : प्रतिनिधी
प्रशासन किती गेंड्याच्या कातडीचे असते याचे उदाहरण आज बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे आणि त्याकरता लागणारे हप्ते मिळावे यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या पारधी समाजातील एका उपोषणकर्त्याचा जीव गेला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
अधिक माहिती अशी की, आप्पासाहेब भुजाराव पवार ( वय, ५५ रा. वासनवाडी ता. जि. बीड ) हे त्यांच्या कुटुंबियांसह दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरात उपोषणासाठी बसले होते. हक्काचे घरकुल बांधून मिळावे आणि त्याकरिता लागणारे हप्ते मिळावे या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले होते. मात्र दुर्दैवाने आज पहाटे थंडीच्या कडाक्यात त्यांचा मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयाला वारंवार अर्ज आणि निवेदन देऊनही मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे आमच्यावर उपोषणास बसण्याची वेळ आली. थंडीच्या कडाक्यामुळेच आप्पासाहेब पवार यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे आप्पासाहेब पवार यांचा मृत्यू झाल्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.