बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणतंही काम घेऊन गेल्यानंतर त्यावर तात्काळ निर्णय होत असतो. मात्र राज्याचा व्याप सांभाळताना बारामतीकरांची गैरसोय होऊ नये यासाठी बारामतीत अजितदादांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात येत आहे. आजही या उपक्रमात बारामती व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी करत आपल्या समस्या मांडल्या. अजितदादांचे खासगी सचिव हनुमंत पाटील यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधत या समस्यांवर तोडगा काढला.
बारामतीत आल्यानंतर अजितदादा नेहमीच जनता दरबार घेऊन नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत असतात. मात्र त्यातूनही लोकांची कामे राहू नयेत यासाठी गेल्या चार वर्षांपासून बारामतीतील राष्ट्रवादी भवनात प्रत्येक सोमवारी लोकाभिमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. यामध्ये अजितदादांचे खासगी सचिव हनुमंत पाटील हे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध असतात. नागरिकांची कामे तात्काळ संबंधित विभागाकडे सांगून त्याचा पाठपुरावा घेण्याचं काम या उपक्रमातून केलं जातं.
आज सोमवारी बारामतीतील राष्ट्रवादी भवनात झालेल्या या लोकाभिमुख उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. अजितदादांचे खासगी सचिव हनुमंत पाटील यांनी या नागरिकांची कामे जाणून घेत त्याबाबत पाठपुरावाही केला. जनतेविषयी असलेली आपुलकी आणि त्यांच्याकडून मिळणारं पाठबळ लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला जात आहे. आपल्या अपरोक्ष कोणतंही काम प्रलंबित राहू नये यासाठी अजितदादांचं कार्यालय दक्ष आहे. त्यातून आज अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहेत.
इथं कामं होतात..!
सामान्य नागरिकांशी अजितदादांचा थेट संपर्क आहे, याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यातूनही लोकांना गैरसोईला तोंड द्यावे लागू नये यासाठी प्रत्येक सोमवारी हा लोकाभिमुख उपक्रम होत असतो. दादांची भेट होवो न होवो, आम्ही सोमवारी राष्ट्रवादी भवनात आल्यानंतर आमची कामे मार्गी लागतात अशी प्रतिक्रिया इथं येणारे नागरीक देतात. दादा कुठेही असले तरी ते बारामतीकरांची काळजी घेतात, याची प्रचिती या निमित्तानं येते.