बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील विविध विकासकामांचे उदघाटन आणि नमो महारोजगार मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज शनिवार दि. २ मार्च रोजी सकाळी १० वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात सभा पार पडत आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशीरा या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.
बऱ्हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय, बारामती येथील पोलिस वसाहत, बारामती बसस्थानक, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय, बारामती शहर पोलिस ठाणे, वाहतुक नियंत्रण कक्ष या नविन इमारतींचे आज उदघाटन होणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी १०-१५ वाजता बारामती विमानतळावर दाखल होतील. तेथून विद्या प्रतिष्ठान मैदानात होणाऱ्या कार्यक्रमाला हजेरी लावतील. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आदी मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशीरा या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला. उदघाटन होत असलेल्या कामांची पाहणी करुन अजितदादांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांना सुचनाही केल्या. बारामतीतील विकासकामांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवर बारामतीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं आहे.