
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त १०० खाटांचं आरोग्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल ७८ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वीच निर्देश दिले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात याबाबतचा शासन निर्णय पारीत झाला आहे. या निमित्तानं अजितदादांना ‘कामाचा माणूस’ का म्हटलं जातं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेले एक १०० खाटांचे रुग्णालय सोमेश्वरनगर परिसरात व्हावे असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मानस होता. त्यानुसार त्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देशही दिले होते. विशेष म्हणजे गुरुवार दि. १४ मार्च रोजी सोमेश्वरनगर येथे अजितदादांनी या प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेबाबत घोषणाही केली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी अधिनस्त १०० खाटांचं आरोग्य पथक अर्थात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
या कामासाठी ७७ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी बांधकाम, पदनिर्मिती व यंत्रसामग्री खरेदीसही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सोमेश्वरनगरसह परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सोमेश्वरनगर येथे बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी बैठक घेऊन यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. अवघ्या तीन दिवसात कार्यवाही पूर्ण करुन शंभर खाटांच्या आरोग्य पथकास (आरोग्य प्रशिक्षण केंद्रास) मान्यता देण्यात आली आहे.