मुंबई : प्रतिनिधी
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज डिस्चार्ज मिळाला. आज सकाळी रुग्णालयातून शरद पवार यांना घरी सोडण्यात आले असून लवकरच ते नेहमीप्रमाणे सक्रिय होणार आहेत.
दिवाळीत संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत होते. या दरम्यान, त्यांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास झाला होता. त्यानंतर मुंबईत पुन्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात दाखल असतानाही शरद पवार यांनी शिर्डीतील राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात पहिल्या दिवशी ऑनलाईन आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष हजेरी लावली. आजारी असतानाही त्यांनी शिबिरात काही वेळ हजेरी लावत मार्गदर्शनही केले.
आज त्यांच्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर ते त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी विश्रांती घेतील. त्यानंतर ते पुन्हा सक्रिय होणार आहेत.