आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राष्ट्रीय

SPECIAL REPORT : २५० दरोडे, ७० हत्त्यांचा आरोप असणारा ‘डाकू’ बनला ‘चित्ता मित्र’; आता करतोय शासकीय योजनेबद्दल जनजागृतीचे काम

राष्ट्रीय
ह्याचा प्रसार करा

मेघना जाधव, आपली बारामती न्यूज

बदल हा काळाचा नियम आहे. माणूस वेळ व काळानुसार स्वतःत बदल करून घेत असतो. मध्यप्रदेश मधील चंबळ खोऱ्यातील कुख्यात दरोडेखोर रमेश सिंग सिकरवार यांनी सुद्धा स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून घेतला आहे. कधीकाळी डाकू म्हणून कुप्रसिद्ध असणारे ते आता चक्क ‘चित्ता मित्र’ बनले आहेत. त्यांच्या कार्यामुळे सध्या ते सर्वत्र चर्चेत आहेत. बरेच वृत्तपत्र व मासिके त्यांच्या मुलाखती देखील घेत आहेत.

आत्मसमर्पण करून सुरू केली समाजसेवा

कर्हाळ येथे शेती करत रमेश सिंग सिकरवार आपले जीवन जगत असून श्योपूर व मुरैना या परिसरातील १७५ गावांमध्ये ते ‘प्रमुख’ आहेत. रमेश सिंग सिकरवार यांच्यावर २५० दरोड्यांचे व ७० हत्यांचे आरोप आहेत. मात्र १९८४ मध्ये त्यांनी आत्मसमर्पण केले आणि त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली. सध्या ते दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या आठ चित्त्यांचे महत्त्व स्थानिक लोकांना पटवून देण्याचे काम करत आहेत. भूतकाळात दरोडेखोर असूनही गावांमध्ये त्यांना मान व सन्मान दिला जातो.

सरकारच्या योजनेसाठी जनजागृतीचे काम

आफ्रिकेतून काल आठ चित्ते काल (दि.१७) मध्यप्रदेश येथे आणले आहेत. पुढील ५ वर्षात आणखी ५० चित्ते भारतात आणण्याची सरकारची योजना असून यासाठी जनजागृती करण्याचे काम रमेश सिंग हे त्यांच्या डझनभर सहकाऱ्यांना सोबत घेऊन करत आहेत. रमेश सिंग दरोडेखोर होते, तेव्हादेखील लोकांच्या भल्यासाठी काम करत असत. वैयक्तिक कारणांमुळे स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबला होता.

१९८४ साली रमेश सिंग यांनी आपल्या टोळीतील ३२ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले होते. जवळ जवळ आठ वर्षे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर सिकरवार यांनी गुन्हेगारी क्षेत्राला रामराम ठोकला. त्या काळात राज्य सरकारने त्यांच्या टोळीसाठी १ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.


ह्याचा प्रसार करा
राष्ट्रीय
Back to top button
Contact Us