
मुंबई : प्रतिनिधी
आजच्या निकालांमध्ये पंजाबमध्ये जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच. मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. पंजाब असं एक राज्य होतं ज्याठिकाणी कॉंग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळं चित्र बघायला मिळत असल्याचंही शरद पवार यांनी नमूद केलं.
पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवार यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘आप’ हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणूकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले. ज्या पध्दतीने प्रशासन दिले, त्यातून दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या दृष्टीने सीमेवरील राज्य आहे. दिल्लीच्या कामाचा फायदा पंजाबमध्ये ‘आप’ ला झाला असं स्वच्छ दिसते असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपचं राज्य स्थापन झाले आहे असेही शरद पवार यांनी सांगितले. लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

आज देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्च पासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पावले उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.
तो महाराष्ट्र भी तैयार है..!
भाजपकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असे बोलले जात असल्याचा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केला असता ठिक आहे ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी यावेळी देत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.