
मुंबई : प्रतिनिधी
फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून दिल्लीत अटक करण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून आज त्यांना बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप आहे. त्यानुसार सीबीआय आणि ईडीकडून त्यांची चौकशी सुरू होती. संजय पांडे यांनी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक असताना अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोप मागे घेण्यासाठी परमबीर सिंग यांच्यावर दबाव आणल्याचाही आरोप आहे.
३० जून रोजी संजय पांडे हे मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांची ईडीने चौकशी सुरू केली होती. आज त्यांची दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी सुरू असताना त्यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.