
सातारा : प्रतिनिधी
काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा फोटो ट्विट करत टीका केली आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तो फोटो अदानींसोबतच आहे ना..? अंडरवर्ल्ड डॉनसोबत तर नाही ना असा सवाल करत कोणीही काही टीका करेल त्याला उत्तर द्यायला बांधील नाही असं अजितदादांनी म्हटलं आहे. त्याचवेळी कोणी काही बोलल्याने आम्हाला भोकं पडत नाहीत अशा शब्दात त्यांनी ठणकावले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्यांवर संवाद साधला. अदानींसोबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. तसेच काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी या फोटोच्या आधारे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. याबाबत विचारणा केली असताना अजित पवार यांनी अदानींसोबतचाच फोटो आहे ना? कोणत्या अंडरवर्ल्ड डाॅन सोबत तर फोटो नाही काढला ना? असा सवाल केला. कोणालाही लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करणं योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणी आम्हाला काही म्हटलं तरी आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. आम्ही कोणच्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधिल नाही. जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं आमचं काम आहे. मात्र ज्याला ओळखतही नाही त्याच्याबद्दल बोलायचं काय कारण असंही अजित पवार यांनी नमूद केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झालेले असताना अजितदादांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.