भोपाळ : वृत्तसंस्था
शासकीय कामासाठी लाच मागण्याचे प्रकार सर्रास घडतात. अशातच लोकायुक्त पथकाच्या कारवाईवेळी एका तलाठ्यानं थेट लाचेपोटी मिळालेल्या नोटा चावून गिळल्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे. स्वत:ला वाचवण्याच्या नादात तलाठ्यानं केलेल्या या कृत्याची सध्या सर्वत्रच चर्चा रंगली आहे.
मध्य प्रदेशमधील कटनी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तलाठ्यानं चक्क लाचेपोटी मिळालेल्या नोटाच चावून गिळल्याचा प्रकार घडला आहे. कटनी जिल्ह्यातल्या बिलहरी येथील तलाठी गजेंद्र सिंह यांनी जमीनीच्या एका कामाबाबत तक्रारदार चंदनसिंह लोधी यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार चंदनसिंह यांनी जबलपूर लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार नोंदवली होती.
या तक्रारीनुसार संबंधित तलाठ्याला रक्कम देण्याची तारीख व जागा ठरवण्यात आली. त्यानुसार लोकायुक्त पथक संबंधित ठिकाणी दाखल झालं. त्यांनी तलाठी गजेंद्रसिंह याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. मात्र त्यानं स्वत:ला वाचवण्यासाठी थेट लाचेपोटी मिळालेली रक्कमच चावून गिळून टाकली. या घटनेनंतर लोकायुक्त पथकाने या नोटा त्याच्या तोंडातून काढण्याचा प्रयत्न केला. परंतू नोटा निघाल्या नाहीत.
संबंधित पथकाने तलाठी गजेंद्र सिंह याला जिल्हा रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतर चावलेल्या नोटा बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, नोटा गिळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संबंधित तलाठ्याने केला असला तरी लोकायुक्त पथकाकडे लाच मागितल्याबाबत व्हाईस रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचं लोकायुक्त पथकाकडून सांगण्यात BIG आलं.