नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणीही नागरिकांना लाईव्ह पाहता येणार आहे. प्रारंभी हे प्रक्षेपण यूट्यूबवर होणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय थेट प्रक्षेपणासाठी स्वत:चा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे.
दि. २७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. शिवसेनेवर हक्क कुणाचा यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे. याबाबत आता येत्या मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. या दरम्यानच सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठापुढील सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातील या प्रकरणापासून केली जाणार आहे.
सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘फूल कोर्ट मीटिंग‘मध्ये घटनापीठासमोरील या खटल्यांच्या थेट प्रक्षेपणाचा निर्णय घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीवेळी थेट प्रक्षेपण केले होते. त्यावेळी ते नॅशनल इन्फॉर्मेटिंक्स सेंटर या सरकारी संस्थेच्या संकेतस्थळावर दाखवण्यात आले होते.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश उदय लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर भर दिला आहे. त्यांनी अवघ्या १३ दिवसांत पाच हजारांपेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १३ दिवसांत एकूण ५,११३ प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये २८३ नियमित, १,२१२ हस्तांतर केलेल्या, तर ३,६१८ अन्य प्रकरणांचा समावेश आहे.