नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत गटनेतेपदी राहुल शेवाळे यांचे नाव दिले आहे. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपसोबत युतीत दाखल झाल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत शिवसेनेच्या १२ खासदारांची भेट घेतली. त्यानंतर या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत गटनेता म्हणून राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. दरम्यान, या सर्व खासदारांसह एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालत असल्याने हे सर्व खासदार आमच्यासोबत आल्याचे म्हटले आहे.
दुसरीकडे शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीच भाजपसोबत युतीसाठी खासदारांनी प्रयत्न करावेत असे सांगितले होते. त्यामुळेच आम्ही शिंदे गटाला पाठिंबा देत भाजपसोबत युती केल्याचा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. दरम्यान, खासदारांचा शिंदे गटाला पाठिंबा हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात असून आता शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागले आहे.