
मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आणि विविध पक्षातील नेत्यांच्या आवाहनानंतर हा निर्णय घेतल्याचं शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत जाहिर केलं. दरम्यान, राजकारणात उत्तराधिकारी नेमणं आवश्यक असल्याचं सांगताना पक्षात आता नव्या दमाच्या लोकांना तयार केलं जाईल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. त्याचवेळी पक्षाच्या समितीने राजीनामा नामंजूर केला होता. त्यानंतर शरद पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते.
राज्यासह देशातील कार्यकर्त्यांनी आपल्या निर्णयाला विरोध करत पक्षात कार्यरत राहण्याची मागणी केली. त्याचवेळी विविध पक्षातील सहकाऱ्यांनी राजीनामा न देण्याबद्दल भुमिका मांडली होती. त्यामुळे आपण पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहून कार्यरत राहण्याचा निर्णय घेत असल्याचं शरद पवार यांनी जाहिर केलं.