
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मागील आठवड्यात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला मोठा दिलासा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा समावेश करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण लागू होणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीसंदर्भात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश सरकारला दिलासा दिला आहे. मध्यप्रदेश सरकारने न्यायालयात सुधारित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी आणि आज बुधवारी सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्यास परवानगी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाला एका आठवड्यात ओबीसी आरक्षणाचा समावेश असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुमारे १ वर्षांपासून लांबणीवर पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण मानला जात आहे.
दरम्यान, मध्यप्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासाह निवडणूक घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात यासाठी सर्वच पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार याबाबत काही भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.