नागपूर : प्रतिनिधी
एकीकडे रशिया आणि युक्रेनच्या युद्धाची चर्चा जगभर सुरू आहे. तर दुसरीकडे आम्ही सुद्धा रोज या युद्धाचा अनुभव घेत आहोत. एक पुतिन दिल्लीत बसून ती आमच्यावर रोज मिसाईल सोडत आहेत, अशी गंभीर टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मिसाईल ते ईडीच्या माध्यमातून सोडत आहेत. परंतु आम्ही त्याला घाबरलो नसून त्यातून वाचलो आहे. सध्या देशाचं राजकारण बदलून गेले असल्याचेही राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचे सध्या शिवसंपर्क अभियान सुरु असून संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरकरांशी संवाद साधत ते शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आज ते लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थित असताना त्यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला.
मी पुन्हा येईन असे म्हणणारे संध्याकाळी इथेच येणार आहेत. तेव्हाही मी येईल, बाजूलाच बसेन. विदर्भ, मराठवाड्यात शिवसेनेचे संपर्क अभियान सुरू आहे. या अभियानाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. लोकांचा प्रतिसाद पाहता ईडीची कारवाई सुरु झाली आहे. या प्रकारची कारवाई करून ते लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं राऊत यांनी म्हटले आहे.