आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पुणे

ACCIDENT : अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; आठजणांचा जागीच मृत्यू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

पुणे
ह्याचा प्रसार करा

जुन्नर : प्रतिनिधी

अहमदनगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील अंजिराची बाग परिसरात एका ट्रकने रिक्षा आणि पिकअपला जोरदार धडक दिल्याने दोन चिमुकल्यांसह आठजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात तीनही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. तसेच या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी आणि दोन लहान मुलांसह रिक्षाने प्रवास करीत होते. यावेळी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळील अंजिराची बाग येथे त्यांच्या रिक्षाला ट्रक आणि पिकअपने जोरदार धडक दिली. या घटनेत गणेश मस्करे, कोमल मस्करे त्यांची दोन चिमुकली मुलं, यांच्यासह ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील आठही जणांचे मृतदेह ताब्यात घेत असून शवविच्छेदनासाठी ओतूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, अहमदनगर-कल्याण महामार्गावर जून्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ ट्रक, पिकअप टेम्पो आणि रिक्षा यांची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत्यू पावलेल्या प्रवाशांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, डिंगोरे गावाच्या परिसरातील अंजीराची बाग नावाच्या भागाजवळ रविवारी (दि. १७) रात्री आठच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सतर्क राहून कर्तव्य बजावावे तसेच वाहनचालकांनी सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. ओतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बचाव, मदतकार्य सुरु केल्याची माहितीही त्यांनी दिली.


ह्याचा प्रसार करा
पुणे
Back to top button
Contact Us