आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
पश्चिम महाराष्ट्र

BIG NEWS : म्हसोबावाडीतील दुर्घटनेवर विधानसभेत चर्चा; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांच्या मदतीची अजितदादांनी केली घोषणा

पश्चिम महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीत विहीरीची रिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. आज शोधकार्यादरम्यान, या चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेबद्दल आमदार दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत माहिती दिली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चारही मृत कामगारांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे.

मंगळवारी सायंकाळी म्हसोबावाडीत विहीर बांधकाम सुरू असताना कॉंक्रिटची रिंग कोसळून चार कामगार गाडले गेले होते. परशुराम चव्हाण, जावेद मुलाणी, मनोज सावंत आणि सोमनाथ गायकवाड हे चार कामगार त्यावेळी काम करत होते. सायंकाळी उशीरा या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून मदतकार्याला सुरुवात करण्यात आली.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी धाव घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या घटनेची माहिती दिली आणि एनडीआरएफ पथक उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यामुळे लागलीच हे पथक घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सकाळी एनडीआरएफच्या पथकाने शोधकार्याला सुरुवात केली.  घटनेचा प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे नेमके हे कामगार कोणत्या ठिकाणी होते याचा मागमूस लागत नव्हता. त्यामुळे एनडीआरएफ पथकाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. मात्र वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत या कामगारांचा शोध घेतला.

आज सकाळी ११ वाजता पहिला मृतदेह शोधण्यात या पथकाला यश आले. तब्बल दोन तासानंतर उर्वरीत तीनही मृतदेह बाहेर काढण्यात या पथकाला यश आले. दरम्यान, आज विधानसभेत आमदार दत्तात्रय भरणे यांनी या घटनेची माहिती देत संबंधित कुटुंबीयांना मदतीची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हसोबावाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा केली.


ह्याचा प्रसार करा
पश्चिम महाराष्ट्र
Back to top button
Contact Us