आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मराठवाडा

संतापजनक : सांभाळण्यासाठी दिलेल्या आठ वर्षाच्या चिमुकल्याची केली विक्री; पाच जण ताब्यात

मराठवाडा
ह्याचा प्रसार करा

गोंदिया : प्रतिनिधी

गोंदिया शहरात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षापूर्वी सांभाळ करण्यासाठी दिलेल्या एका आठ वर्षाच्या चिमुकल्याला १ लाख २० हजार रुपयांमध्ये विकल्याची धक्कादायक घटना गोंदिया  शहरातील कुंभारेनगर येथे घडली आहे. याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन वर्षापूर्वी पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला दुसरे लग्न करण्यासाठी इंदू (नाव बदललेले) नावाच्या एका महिलेने तो मुलगा मनीषा संतोष चंद्रिकापुरे या महिलेला सांभाळण्यासाठी दिला. दोन वर्षानंतर इंदू आपल्या मुलाला भेटण्यासाठी २२ फेब्रुवारी २०२२ ला मनीषाकडे आली. परंतु मनीषाकडे  तिचा मुलगा नव्हता. इंदूने मनीषाला मुलाबद्दल विचारले. मनीषाने उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे इंदुच्या मनात आपल्या मुलाचा अपहरण झाल्याचा संशय बाळगला.

याप्रकरणी इंदूने १ मार्चला गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ  तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांना तो लहान मुलगा भंडाऱ्यातील आंधळगाव याठिकाणी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे पथकाने इंदुला घेऊन आंधळगाव गाठले.

आंधळगावात कलोज भोरे आणि अनिता भोरे या जोडप्याकडे मुलगा असल्याचे आढळले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता १ लाख २० हजार रुपयांमध्ये या मुलाला विकल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले असून यामध्ये आणखी काहीजणांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


ह्याचा प्रसार करा
मराठवाडा
Back to top button
Contact Us