औरंगाबाद : प्रतिनिधी
सिल्वर ओकवर जे झालं, तो माझ्या आईवरील हल्ला होता. माझा देश, माझे राज्य ही माझी आई आहे. त्यामुळे हा हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावरील हल्ला असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सिल्वर ओकवर झालेल्या हल्ल्याबद्दल मोठं विधान केलं. त्या दिवशी मी स्वत: आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी ठेवली होती. त्यांना तशी विनंतीही केली होती. मात्र त्या दिवशी आंदोलक आणि महिला असे का वागले हे माहीत नाही. मात्र त्यांना नेमका काय त्रास आहे हे जाणून घेणं ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
मी आजही पोलिसांशी संपर्क साधून त्या महिलांशी मला बोलायचं असल्याचं कळवले आहे. मला त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत हे जाणून घ्यायचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. हा देश, हे राज्य माझी आई आहे आणि त्या दिवशी झालेला हल्ला हा माझ्या आईवरील पर्यायानं पुरोगामी महाराष्ट्रावरील हल्ला होता असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.
८ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हल्ला झाला. त्यामध्ये अनेक महिलांनी बांगड्या फोडल्या. तर काहींनी चपला आणि दगडफेकही केली होती. या घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत होता. या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शंभरहून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे.