आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
मराठवाडा

विरोधी पक्षनेते अजितदादांचा रविवारी बीड जिल्हा दौरा; धनंजय मुंडेही दौऱ्यात होणार सहभागी

अंबाजोगाई, माजलगाव, वडवणीसह विविध तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीची करणार पाहणी

मराठवाडा
ह्याचा प्रसार करा

बीड : प्रतिनिधी

राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत रविवारी (दि. ३१ जुलै) सकाळी ८ वाजल्यापासून बीड जिल्हा दौरा करणार असून, ते जिल्ह्यात पावसाने व किडीच्या प्रादूर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत.

रविवारी अजित पवार हे सकाळी ९ वाजता प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. मागील काही दिवसात गोगलगाय व अन्य किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचबरोबर काही ठिकाणी कमी व अधिक पावसाने पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही.  तर काही ठिकाणी अधिकच्या पावसाने शेतात पाणी साठलेले आहे.

कोणत्याही परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे, असे असताना सत्ता पक्ष शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सध्यातरी उपलब्ध असल्याचे दिसत नाही. मात्र विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार हे मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून त्यांना आधार देण्यासाठी सरसावले असल्याचे पाहायला मिळते आहे.

दरम्यान, अजित पवार, धनंजय मुंडे हे सकाळी १०.१५ वाजता  जवळगाव ता. अंबाजोगाई येथील पीक नुकसानीची पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ११.४५ वाजता माजलगाव तालुक्यातील  बेलूरा व दुपारी १२.४५ वाजता वडवणी तालुक्यातील चिंचोटी येथे पिकनुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

दुपारी २.३० वाजता बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पाऊस व पीक परिस्थिती बाबत ते अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करतील व त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, सत्तेत असताना मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी काळात देखील अजित पवार व धनंजय मुंडे ही जोडी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली होती. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून दिल्याचे सर्वश्रुत आहे. आता सत्तेत नसतानाही हे दोन्ही नेते पुन्हा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत असून, या भूमिकेचे स्वागत केले जात आहे.


ह्याचा प्रसार करा
मराठवाडा

दैनिक बातम्या मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा

नवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांबद्दल प्रथम शोधा

सबस्क्राईब
Back to top button
Contact Us