
जालना : प्रतिनिधी
जालना शहरातून चोरीला गेलेल्या एका स्विफ्ट कारचा शोध घेताना जालना पोलिसांना भलत्याच टोळीचा शोध लागला आहे. चारचाकी वाहनांची चोरी करणारं एक अख्खं कुटुंबच पोलिसांच्या जाळ्यात अडकलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातून या टोळीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीने सेन्सॉर डिव्हाईस किटचा वापर करत चारचाकी वाहने चोरी केल्याचेही उघड झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, जालना शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक स्वीफ्ट डिझायर कार चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. जालना पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू करत चारचाकी चोरी करणाऱ्या काही टोळ्यांबद्दल माहिती घेतली. या दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील टोळीने चारचाकी वाहनांच्या चोरीचा सपाटा लावल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.
पोलिसांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शोध पथकामार्फत बुलढाणा जिल्ह्यातील धाडकरडी येथे छापा टाकला. त्यामध्ये जालना येथून चोरीला गेलेली कार आढळून आली. अधिक तपास केल्यानंतर संपूर्ण कुटुंबच चारचाकी वाहनांची चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. ओबीडी स्टार नावाच्या सेन्सॉर डिव्हाईस किटच्या सहाय्याने हे चारचाकी वाहनांची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जालना पोलिसांनी या टोळीतील शेख दाऊद उर्फ बब्बू शेख मंजूर (वय ५६), शेख अफजल ऊर्फ गोलू शेख दाऊद (वय २२), शेख राजा शेख दाऊद (वय २४), शेख फरदीन शेख युसूफ (वय २४), अरबाज शेख दाऊद या पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील शेख दाऊद हा आपल्या चार मुलांसह कार चोरीचे काम करत होता. या आरोपींकडून चोरलेल्या कारसह गुन्ह्यात वापरलेली कार आणि अन्य साहित्य असा एकूण ९ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चारचाकी चोरीसाठी या टोळीने अनोखी शक्कल लढवली होती. ओबीडी स्टार नावाचं सेन्सॉर डिव्हाईस किट वापरुन चारचाकी चोरीचे गुन्हे केले जात होते. अवघ्या २० हजार रुपये किमतीचे हे किट ऑनलाईन मागवले होते. आता पोलिसांनी या फॅमिली गॅंगने केलेल्या चोरीबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अख्खं कुटुंबच चारचाकी चोरी करत असल्याचं उघड झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.