औरंगाबाद : प्रतिनिधी
महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. एकतर्फी प्रेमातून देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीला ओढत नेत चाकूने भोकसून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयांच्या परिसरात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ग्रंथी सुखप्रीत कौर असे हत्या झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. ती देवगिरी महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत होती. आज दुपारी ही विद्यार्थीनी महाविद्यालयात आलेली असता त्या ठिकाणी एक तरुण आला. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्याने या विद्यार्थीनीला महाविद्यालयासमोरून ओढत नेत तिला चाकूने भोकसले.
शरण सिंग असे या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर औरंगाबाद पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. दुसरीकडे पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक पाठवले आहे.