
बीड : प्रतिनिधी
टिकटॉक स्टार गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला आहे. बीडमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला आहे.
याबाबत माहिती अशी की, बीड शहरातील बार्शी नाका भागात एका वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता. कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील हिचे नृत्य सुरु असतांना काही तरुणांनी व्यासपीठावर जाऊन नृत्य केले.
ते पाहून मोठ्या प्रमाणात गर्दी व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला. कार्यक्रमात झालेली गर्दी आणि हुल्लडबाजी यामुळे अखेर हा कार्यक्रम थांबवण्यात आला. या प्रकारामुळे काही काळ वातावरण चांगलेच तंग झाले होते.