
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
शुक्रवार दि. २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी केली जात असतानाच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात साप सोडण्याचा इशारा एका संघटनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनासह पोलिस यंत्रणेची चांगलीच भंबेरी उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल टी पॉईंट येथे भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा बसवावा अशी गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा आंदोलनंही करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून कसलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता पॅंथर्स आर्मी या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी ही मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात साप सोडण्याचा इशारा या संघटनेने दिला आहे. वारंवार मागणी करुनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे या संघटनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यामुळे प्रशासनासह पोलिस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली आहे.
शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचा दौरा वादळी ठरणार आहे. अशातच पॅंथर्स आर्मी या संघटनेने आगळंवेगळं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शुक्रवारच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.