बीड : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. त्यांच्या परळी विधानसभेच्या मतदारसंघातील दिवसभरातील कार्यक्रम व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर परळीच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. अपघातामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी एअर अॅम्बूलन्सने मुंबईला नेण्यात आले आहे. मुंबईतच थांबून ते उपचार घेणार आहेत.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत या अपघाताची माहिती दिली. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे. यात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी खास एअर अॅम्बूलन्सने धनंजय मुंडे यांना मुंबईत नेले जाणार आहे. दुसरीकडे या अपघातात धनंजय मुंडे यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.