
औरंगाबाद : प्रतिनिधी
सध्या देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी सणाच्या खरेदीसाठी सर्वत्र लगबग सुरू आहे. औरंगाबाद शहरात दिवाळीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. खरेदी करून घरी जात असताना भरधाव वेगातील आयशर टेम्पोने धडक दिल्याने पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे लाखेगाव गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत माहिती अशी की, पैठण तालुक्यातील बिडकिन येथील एमआयडीसीजवळ आज सकाळी हा अपघात झाला. लाखेगाव येथील रहिवाशी साळवे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून दिवाळीच्या खरेदीसाठी गेले होते. खरेदीनंतर परतत असताना बिडकीनच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील वंदना राजू साळवे यांचा जागीच मृत्यू झाल्या. तर राजू बन्सी साळवे हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर राजू साळवे यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने लाखेगाव गावावर शोककळा पसरली आहे.