नांदेड : प्रतिनिधी
शिक्षणासाठी आजीजवळ राहण्यासाठी आलेल्या चिमूकलीवर अत्याचार करणाऱ्या चुलत्याला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी या प्रकरणात आरोपीला शिक्षा ठोठावली.
याबाबत माहिती अशी की, यातील पिडीत मुलगी आपल्या आजीजवळ शिक्षणासाठी गेली होती. इयत्ता सातवीत शिकणारी ही मुलगी २९ जानेवारी २०१० रोजी तब्येत बरी नसल्याने घरीच थांबली होती. याचदरम्यान तिची आजी दळण आणण्यासाठी बाहेर गेली होती. त्याचवेळी नात्याने चुलता लागणारा आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने संबंधित पीडितेला जबरदस्तीने बाहेर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. आजी घरी परतेपर्यंत आरोपी पळून गेला होता.
आपल्याला मारहाण होईल या भीतीने पीडितेने याबाबत कोणालाही सांगितले नाही. काही दिवसांनी तिने याबद्दल आपल्या आई आणि मावसबहिणीला माहिती दिली. त्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी लिंबगाव पोलिस ठाण्यात या प्रकाराबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले. वैद्यकीय अहवाल, पीडितेची साक्ष आणि पोलिसांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य मानत न्यायालयाने आरोपी चुलत्याला २० वर्ष सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.