आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
महाराष्ट्र

BIG NEWS : रणजीत निंबाळकर गोळीबार प्रकरण; सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे आवाहन

महाराष्ट्र
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून सोशल मीडियात विविध अफवा येत आहेत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे आवाहन अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी निंबूत येथील ट्रीपल हिंदकेसरी गौतम काकडे यांनी रणजीत निंबाळकर यांच्याकडील ‘सुंदर’ हा बैल खरेदी केला होता. ३७ लाख रुपयांमध्ये हा व्यवहार ठरला होता. त्यासाठी गौतम काकडे यांनी ५ लाख रुपये विसार म्हणून दिले होते. उर्वरीत रक्कम कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे ठरवण्यात आले होते. काल गुरुवारी रात्री रणजीत निंबाळकर हे आपल्या कुटुंबीय व मित्रांसह गौतम काकडे यांच्याकडे निंबूत येथे गेले होते.

YouTube player

रणजीत निंबाळकर यांनी संबंधित बैलाच्या व्यवहाराची रक्कम द्यावी किंवा विसार परत घेऊन बैल परत द्यावा असं गौतम काकडे यांना सांगितलं. यातूनच त्यांच्यात वादावादी झाली. त्यातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी त्यांच्याकडील पिस्तूलमधून रणजीत निंबाळकर यांच्यावर एक गोळी झाडली. त्यामध्ये डोक्यात गोळी गेल्याने रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर या घटनेबाबत विविध अफवा पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. तसेच रणजीत निंबाळकर यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी धोक्याच्या बाहेरील परिस्थिती असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणीही या घटनेबाबत अथवा रणजीत निंबाळकर यांच्याबाबत सोशल मीडियातून चुकीच्या अफवा पसरवू नये असे आवाहन या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच रणजीत निंबाळकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.


ह्याचा प्रसार करा
महाराष्ट्र
Back to top button
Contact Us