रणजीत निंबाळकर यांनी संबंधित बैलाच्या व्यवहाराची रक्कम द्यावी किंवा विसार परत घेऊन बैल परत द्यावा असं गौतम काकडे यांना सांगितलं. यातूनच त्यांच्यात वादावादी झाली. त्यातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी त्यांच्याकडील पिस्तूलमधून रणजीत निंबाळकर यांच्यावर एक गोळी झाडली. त्यामध्ये डोक्यात गोळी गेल्याने रणजीत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर या घटनेबाबत विविध अफवा पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. तसेच रणजीत निंबाळकर यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी धोक्याच्या बाहेरील परिस्थिती असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कोणीही या घटनेबाबत अथवा रणजीत निंबाळकर यांच्याबाबत सोशल मीडियातून चुकीच्या अफवा पसरवू नये असे आवाहन या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच रणजीत निंबाळकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.