
मुंबई : प्रतिनिधी
ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू तथा महान स्पिनर शेन वॉर्न यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ५२ व्या वर्षी शेन वॉर्न यांनी जगाचा निरोप घेतला आहे. शेन वॉर्न हे थायलंडमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांची तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शेन वॉर्न हे सध्या थायलंडमधील कोह सामुई बेटावर असलेल्या बंगल्यात वास्तव्यास होते. त्याच ठिकाणी ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेन वॉर्न यांच्या अकाली निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.
जगातील अव्वल स्पिनर म्हणून शेन वॉर्नची ख्याती होती. १९९२ साली त्यांनी सिडनी कसोटीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर २००७ साली त्यांनी इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळत निवृत्ती घेतली होती. १४५ कसोटी सामन्यांत तब्बल ७०८ विकेट्स त्यांच्या नावावर आहेत. त्याचबरोबर १९४ एकदिवसीय सामन्यात २९३ विकेट्स घेतल्या होत्या. १९९६ आणि १९९९ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यांचा मोलाचा वाटा होता.